श्रीमंत सद्गुरु शंकर महाराजांचा समाधी सोहळा थाटात संपन्न.

Ahmednagar Breaking News
0

श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज यांच्या 77 व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम....


नगर, प्रतिनिधी.(16.मे 2024.) : श्रीमंत सद्गुरु शंकर महाराजांच्या 77 व्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठ,शिवाजीनगर, केडगाव येथे बुधवार,15 मे रोजी पहाटे 5:00 वाजता श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालून महापूजा करण्यात आली.त्यानंतर सकाळी 9:00 वाजल्यापासून मठाच्या आवारातील पटांगणात 301 कुंडात्मक महादत्तयाग व महानवचंडीयागचा विशेष कार्यक्रम सुरु झाला.या कार्यक्रमासाठी नगर शहरासह महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.

दुपारी 12:00 वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,भाविक भक्तांसाठी महाप्रसाद रात्री पर्यंत ठेवण्यात आला होता.

श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठाचे मठाधिपती गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास दादा पाटील अध्यक्ष श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान,घोडबंदर रोड,ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी श्रींचा भव्य महापालखी सोहळा परिसरातून काढण्यात आला. श्रींची पालखी आकर्षक फुलांनी व विविध रंगी फुलांनी सजवलेली होती. पालखीच्या पुढे ठाण्यातील प्रसिद्ध बँड पथक व हलगी पथक होते. पालखीच्या मागे आकर्षक लाइटिंगने सजवलेल्या घोड्यांनी स्वार असलेल्या चार बग्गी होत्या. पालखी सोहळ्याच्या मार्गावर परिसरातील महिलांनी आपापल्या दारासमोर साफसफाई करून सडा मारून विविधरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. परिसरातील नागरिक आपापल्या दारापुढे श्रींच्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेत होते. यावेळी पालखीच्या पुढे आकर्षक, विविधरंगी आतिषबाजी करण्यात येत होती. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी बँड पथक व हलगीच्या तालावर मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर योगेशजी तपस्वी यांच्या भजन संस्थेचा भाविक भक्तांनी आनंद लुटला.यावेळी मंदिर परिसरात विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती.






Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top