अखिल भारतीय नाट्यपरिषद अहमदनगर उपनगर शाखेच्या अध्यक्षपदी प्रसाद बेडेकर यांची निवड.
अहमदनगर, प्रतिनिधी. (18.जून. 2024.) : नगर येथील अखिल भारतीय नाट्यपरिषद अहमदनगर उपनगर शाखेची कार्यकारणी बैठक नुकतीच पार पडली. परिषदेचे अध्यक्ष क्षितिज झावरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्याच्या कार्यकाळातील लेखाजोखा कार्यकारणीसमोर मांडण्यात आला.तसेच पुढील अध्यक्ष म्हणून प्रसाद बेडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच चैत्राली जावळे यांची प्रमुख कार्यवाहपदी फेर निवड करण्यात आली.
प्रसाद बेडेकर हे गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ नाट्यपरिषदेत तसेच नाट्यक्षेत्रात कार्यरत असून सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.शहरातील प्रथितयश सूत्रसंचालक म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
या निवडीबद्दल बोलतांना बेडेकर म्हणाले की, अखिल भारतीय नाट्य परिषद ही मातृसंस्था असून नवनवीन कलाकार घडविणे ही खऱ्या अर्थाने परिषद म्हणून आपली जबाबदारी आहे. नाट्यचळवळ तळागाळात रुजवण्यासाठी अगदी शालेय जीवनापासून नाट्य कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचं आहे. या साठी येणाऱ्या काळात परिषदेच्या माध्यमातून उपक्रम घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले.या बैठकीला क्षितिज झावरे, चैताली जावळे,संजय लोळगे सुदर्शन कुलकर्णी,प्रशांत जठार, अभय गोले, पी.डी. कुलकर्णी, विद्या जोशी,जालिंदर शिंदे,गणेश सपकाळ, आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
या निवडीबद्दल नगरमधील सर्व कलाप्रेमी व्यक्तींकडून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होतं आहे.